भुसावळात मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
भुसावळ (प्रतिनिधी):- येथील नारायण नगर परिसरात एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका हिंस्र पाळीव कुत्र्याने केलेल्या भीषण हल्ल्यामुळे ९ वर्षीय बालकाचा ‘रेबीज’ होऊन मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नारायण नगर भागातील गजानन महाराज मंदिराजवळ राहणारा तारूष विशाल झोपे (वय ९ वर्षे ६ महिने) हा दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६:४५ च्या सुमारास शाळेच्या व्हॅनमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. घरासमोरील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन परत येत असताना, शेजारी राहणारे प्रकाश ऊर्फ खन्ना एकनाथ कोळी यांच्या घरातील तपकिरी रंगाच्या कुत्र्याने अचानक तारूष वर झडप घातली.
कुत्र्याने तारूषला जमिनीवर पाडून त्याच्या तोंडाचा, नाकाचा आणि डाव्या डोळ्याच्या वरील भागाचा अक्षरशः लचका तोडला. आई आणि आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा करत धाव घेतली आणि मोठ्या मुश्किलीने तारूषला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले. या हल्ल्यात बालक रक्ताबंबाळ झाला होता.
मालकाचा निष्काळजीपणा जीवावर बेतला
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, कुत्रा मालक प्रकाश कोळी याने आपल्या हिंस्र कुत्र्याचे लसीकरण (Vaccination) केले नव्हते. कुत्रा हिंस्र आहे हे माहित असूनही त्याला साखळदंडाने न बांधता किंवा तोंडाला ‘मास्क’ न लावता सार्वजनिक ठिकाणी मोकळे सोडले. मुलावर हल्ला होत असताना मालकाने त्याला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, असा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. कुत्र्याला रेबीजचे इंजेक्शन न दिल्याने, त्याच्या चाव्यामुळे तारूषला रेबीजची लागण झाली आणि उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी मृत बालकाची आई सौ. भावना विशाल झोपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश ऊर्फ खन्ना एकनाथ कोळी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५, १२५, २९१ आणि BPACT १०६/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे करत आहेत. एका निष्पाप बालकाचा मालकाच्या निष्काळजीपणामुळे बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









