मोटार अपघात, चेक बाऊन्स, वैवाहिक वादांसह विविध प्रकरणांवर होणार सुनावणी
जळगाव (प्रतिनिधी):-वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित राहणारे खटले सामोपचाराने निकाली काढण्यासाठी आज, शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी जळगाव येथे ‘राष्ट्रीय लोक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात हा उपक्रम राबविण्यात येत असून, शेकडो प्रकरणे तडजोडीने निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या लोक अदालतीचे अध्यक्षपद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी भूषविणार आहेत. या उपक्रमासाठी जिल्हा वकील संघ, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे.
लोक अदालतीमध्ये मोटार वाहन ट्रॅफिक चलन, भूसंपादन प्रकरणे, धनादेश अनादर (चेक बाऊन्स), वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, दिवाणी तसेच फौजदारी स्वरूपाची तडजोडयोग्य प्रकरणे हाताळण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यांसह दाखलपूर्व (Pre-litigation) प्रकरणांनाही सामोपचाराने निकाली काढण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय संस्था, भ्रमणध्वनी कंपन्या आणि दूरसंचार विभागांकडून थकीत देयकांमध्ये विशेष सवलत देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना कमी खर्चात, जलद आणि सन्मानपूर्वक वाद मिटवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
ज्या पक्षकारांना आपले प्रकरण सामोपचाराने निकाली काढायचे आहे, त्यांनी आपल्या वकिलांसह लोक अदालतीत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच ऐनवेळीही तडजोडीसाठी प्रकरणे ठेवण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.











