शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी वाढणार गस्त; हेल्पलाईनवर अवघ्या १० मिनिटांत मिळणार प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहरातील महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले ‘दामिनी पथक’ गेल्या काही दिवसांपासून बंद होते. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेत, पोलीस प्रशासनाने हे पथक तातडीने पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून जळगाव शहराच्या रस्त्यांवर दामिनी पथकाची गस्त पुन्हा सुरू होणार असून, यामुळे महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस अधीक्षकांनी दिल्या विशेष सूचना: दामिनी पथक पुन्हा सुरू करण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांनी स्वतः सर्व नवीन नियुक्त महिला पोलीस अंमलदारांशी संवाद साधला. यावेळी कामाचे स्वरूप कसे असावे आणि जनतेला काय अपेक्षा आहेत, याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पथकाच्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी त्यांना एक चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
असे असेल ‘दामिनी पथकाचे’ कामकाज:
शाळा-महाविद्यालयांत गस्त: छेडछाड रोखण्यासाठी शाळा, कॉलेजेस, बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी हे पथक सतत गस्त घालेल.
जागरूकता अभियान: विद्यार्थिनींना ‘गुड टच-बॅड टच’ तसेच सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत माहिती देऊन त्यांचे प्रबोधन केले जाईल.
त्वरीत प्रतिसाद: महिला हेल्पलाईन (उदा. १०९१) वर कॉल आल्यास अवघ्या १० मिनिटांत प्रतिसाद देण्याचा या पथकाचा प्रयत्न राहणार आहे.
कायदेशीर व मानसिक आधार: पीडित महिलांना केवळ कायदेशीर मदतच नव्हे, तर वैद्यकीय आणि मानसिक आधार (समुपदेशन) देण्याचे कामही हे पथक करेल.
महिला सुरक्षा हाच मुख्य उद्देश: छेडछाड, अत्याचार आणि घरगुती हिंसाचार यांसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे हा या पथकाचा मुख्य उद्देश आहे. महिलांनी न घाबरता तक्रारी करण्यासाठी पुढे यावे आणि समाजात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण व्हावा, यासाठी हे विशेष महिला पोलीस पथक अहोरात्र कार्यरत राहणार आहे. या निर्णयामुळे जळगाव शहरातील विद्यार्थिनी आणि नोकरी करणाऱ्या महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.









