मुक्ताईनगर (प्रतिनिधी):- येथील बेलदार वाडा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ११.३० या वेळेत घडली असून २ मे रोजी दुपारी याबाबत तक्रार नोंदविण्यात आली.

तक्रारदार गणेश शंकर बेलदार (वय ४५) हे कुटुंबीयांसह लग्नसमारंभासाठी बाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून रोख रक्कम व चांदीचे दागिने असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ८० हजार रुपये रोख (५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटा) तसेच अंदाजे १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.









