तांबापुरात वृद्धाला धमकावून ५०० रुपये लुटले
जळगाव (प्रतिनिधी) : शहरांतील तांबापुरा भागातील मच्छी बाजार परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका तरुणाने वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. तसेच तिच्या पतीच्या खिशातील ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांबापुरा भागातील युसूफ मुसा खाटीक (वय ६५, रिक्षा चालक) हे २६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या घराबाहेर पत्नी सलमा बी यांच्यासह पाणी भरत होते. यावेळी संशयित आरोपी मोहम्मद शेख मेहमूद याने सलमा बी यांच्याकडे दारू पिण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. सलमा बी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने मोहम्मदला राग आला. त्याने संतापून जवळच असलेला दगड उचलून सलमा बी यांच्या डोक्यात मारला, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.
दगड मारल्यानंतर मोहम्मदने युसूफ खाटीक यांच्या खिशातील ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि तिथून पळ काढला. जखमी पत्नीला उपचारासाठी युसूफ खाटीक यांनी तातडीने ‘सारा हॉस्पिटल’ मध्ये दाखल केले. पत्नीवर उपचार सुरू असताना, २७ एप्रिलच्या मध्यरात्री संशयित मोहम्मदचा पिता मेहमूद शेख मेहबूब हा हॉस्पिटलबाहेर आला. त्याने युसूफ खाटीक यांना गाठून मुलाने केलेल्या कृत्यावर पांघरूण घालण्याऐवजी, उलट त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
युसूफ खाटीक यांच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात मोहम्मद शेख मेहमूद आणि मेहमूद शेख मेहबूब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोळे करीत आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.









