मध्यवर्ती भागातील घटना, अप्पर एसपी, महापौरांची भेट
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात जुन्या पोलिस मुख्यालयातील रेकॉर्ड रूमला सोमवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली. कार्यालयाच्या कॅन्टीनजवळील स्टोअर रूमला अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील स्टोअर रूममधून अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात येताच परिसरात धावपळ सुरू झाली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरात धुराचे लोट पसरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे ३ बंब अवघ्या काही वेळात घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि समन्वयपूर्ण कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे आग परिसरात इतरत्र पसरली नाही. या मोहिमेत अग्निशमन दलाचे अधिकारी भारत बारी, अश्वदीप घरडे, वाहनचालक देविदास सुरवाडे यांच्यासह अक्षय नाईक, भगवान पाटील, यश मनोरे आणि तेजस जोशी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांच्या जलद प्रतिसादामुळे मोठी हानी टळली असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, महापौर दीपमाला काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे, निरीक्षक सागर शिंपी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, वातावरणातील वाढत्या उष्णतेच्या तीव्रतेमुळे शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणाने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे स्टोअर रूममधील साहित्याचे नुकसान झाले असून, पोलीस प्रशासनाकडून आता घटनेचा अधिक सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.









