भाजप आपली जागा सोडणार की शिंदे गट बाजी मारणार?
जळगाव (प्रतिनिधी) – राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच जळगाव जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांच्या सुपुत्रांनी शड्डू ठोकल्याने ही लढाई आता ‘हाय-प्रोफाइल’ वळणावर येऊन ठेपली आहे. प्रामुख्याने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे सुपुत्र विशाल देवकर आणि विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील यांची नावे चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दहा खात्यांचे मंत्रिपद भूषवलेले माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर आता सक्रिय राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहेत. ते भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. दुसरीकडे, शिंदे गटाचे ताकदवान नेते ना. गुलाबराव पाटील यांनी आपले सुपुत्र, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासाठी जोरदार ‘फील्डिंग’ लावली आहे. ही जागा सध्या भाजपकडे असली, तरी ती शिंदे गटाला सुटणार का? हा मोठा प्रश्न महायुतीसमोर उभा ठाकला आहे.
जळगावची ही जागा भाजपकडे असल्याने पक्षात इच्छुकांची मोठी फळी तयार झाली आहे. दुसरीकडे या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेत सदस्य नसल्यामुळे व निवडणूक होऊन निकाल लागलेला नसल्यामुळे तेथे मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही असे चित्र आहे. मात्र मागील काळात जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी मतदान करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती मिळाली आहे. जोवर निवडणूक होत नाही तोवर या विधानपरिषद निवडणुकीमध्ये आम्हाला माजी सदस्य का होईना मतदानाचा अधिकार द्यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे ते करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
संभाव्य उमेदवार
नंदकुमार आडवाणी (जळगाव)
विशाल देवकर (जळगाव)
अमोल शिंदे (पाचोरा)
नंदकिशोर महाजन (रावेर)
राजेंद्र फडके (मुक्ताईनगर)
अशोक कांडेलकर (मुक्ताईनगर)
प्रतापराव पाटील (पाळधी)
राजकीय जाणकारांच्या मते, जर ही निवडणूक बिनविरोध झाली, तर नंदकुमार आडवाणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, निवडणूक झाल्यास भाजपकडून मराठा चेहरा देण्यावर भर दिला जाऊ शकतो. जळगाव जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांवर सध्या भाजप व शिंदे गटाचे वर्चस्व असल्याने महायुतीचे पारडे जड दिसत आहे. मात्र, ही निवडणूक मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकदीवर लढवली जात असल्याने, ऐनवेळी कोण मैदान मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे काय भूमिका घेतात, यावर अनेक समीकरणे अवलंबून असतील.
एकीकडे महायुतीत जागेवरून चुरस असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी (अजित पवार व शरद पवार गट) अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. योग्य वेळ पाहून सक्षम उमेदवार रिंगणात उतरवण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जात आहे. पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा आणि भाजपची आपली जागा टिकवून ठेवण्याची जिद्द, यामुळे जळगाव विधान परिषदेची ही निवडणूक आगामी काळातील सर्वात गाजणारी निवडणूक ठरणार, यात शंका नाही.
मागील काळ जर बघितला तर या निवडणुकीत माजी मंत्री सुरेशदादा जैन व एकनाथराव खडसे यांच्याच विचारानुसार ही निवडणूक लढवली जायची कोण उमेदवार उभा करायचा हा निर्णय सुद्धा हेच लोक घेत होते. परंतु आता काळ बदललेला आहे. निवडणुकीत आता हे दोघेही नेते बाहेर असल्यामुळे या निवडणुकीत ११ आमदार व ४ मंत्री काय निर्णय घेतात की पक्षश्रेष्ठीकडे सोडतात हे वेळेवर कळेल.









