५.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
चोपडा (प्रतिनिधी):- चोपडा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चुंचाळे शिवारातील एका शेतातून शासनाने प्रतिबंधित केलेले आणि विनापरवाना साठा केलेले एचटीबीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत एकूण ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चुंचाळे शिवारातील एका शेतात दि. २० एप्रिल रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास बेकायदेशीररीत्या बियाण्यांचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभागाने धाड टाकली असता, तिथे ‘सुपरकिंग’ वाणाचे अनधिकृत कापूस बियाणे मिळून आले. एकूण किंमत: ५,४०,०००/- रुपये (प्रति पाकीट १२०० रुपये प्रमाणे) ९ गोण्यांमध्ये भरलेला हा साठा शेतकऱ्यांना विना बिल विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आला होता.
जप्त केलेल्या पाकिटांवर उत्पादकाचे नाव, विक्रेत्याचे नाव, पत्ता, बॅच नंबर किंवा इतर कोणतीही कायदेशीर माहिती उपलब्ध नव्हती. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील बियाणे निरीक्षक रामचंद्र मिठााराम पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी नितीन नंदलाल चौधरी (रा. चुंचाळे, ता. चोपडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहेत. शेतकऱ्यांची दिशाभूल करून आणि शासनाचे नियम धाब्यावर बसवून अशा प्रकारे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे आणि पक्के बिल आवर्जून घ्यावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.









