मेहरूण परिसरातून आवळल्या मुसक्या
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसरातील गेट क्रमांक ३ च्या पार्किंगमधून रिक्षा चोरी करणाऱ्या संशयिताला जिल्हापेठ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून ७५ हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून एमएच १९ बीजे ४०२५ या क्रमांकाची तीन चाकी अॅपे रिक्षा दि. १२ एप्रिल रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांनी विशेष पथक तयार केले होते.
तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे, रामेश्वर कॉलनी (मेहरूण) येथे राहणारा कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे याच्याकडे एक पॅजो रिक्षा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो जळगाव शहरात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. पथक पेट्रोलिंगवर असताना पांडे डेअरी चौकातील एम.एस.ई.बी. ऑफिसजवळ सदर रिक्षा दिसली. पोलिसांनी रिक्षा थांबवून चालकाची विचारपूस केली असता त्याने आपले नाव कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (वय ३२, रा. शांती नारायण नगर, रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव, मूळ रा. तोंदे ता. शिरपूर जि. धुळे) असे सांगितले. अधिक चौकशी केली असता त्याने ही रिक्षा सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी ७५ हजार रुपये किमतीची काळ्या आणि पिवळ्या रंगाची रिक्षा जप्त केली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, आणि प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार मिलिंद सोनवणे, कमलेश पवार, तुषार पाटील, गोविंद साबळे, नरेंद्र दिवेकर आणि प्रवीण जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक कमलेश पवार करीत आहेत









