नागरिकांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील अत्यंत गजबजलेल्या टॉवर चौक परिसरात आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका चालत्या इंडिका कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. भरचौकात कारमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्याने परिसरात काही काळ नागरिकांची मोठी धावपळ उडाली. मात्र, परिसरातील नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने ही आग वेळीच विझवण्यात यश आले.

जळगावात एम.एच. १९ बी.यु. ७५६२ या क्रमांकाची इंडिका कार दुपारी दोनच्या सुमारास टॉवर चौकातून जात असताना अचानक कारच्या इंजिनमधून धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने पेट घेतला. ही बाब लक्षात येताच चालकाने कार थांबवली. भरवस्तीत लागलेल्या या आगीमुळे आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवण्यात आले. तत्पूर्वी, परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत पाण्याचा मारा करून इंजिनमधील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली. घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरील गर्दी पांगवून आणि कार रस्त्याच्या एका बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
सुदैवाने, ही आग वेळीच विझवण्यात आल्यामुळे इंडिका कारचे फारसे मोठे नुकसान झाले नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारला आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.









