अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठी हानी टळली
जळगाव (प्रतिनिधी):- खोटे नगर परिसराजवळील विठ्ठलवाडी येथे आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला असला, तरी या आगीत फ्रीजसह घराचे वायरिंग जळून खाक झाले आहे.

आज दि. १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता विठ्ठलवाडीतील घरमालक गोपाळ जगन्नाथ भक्त यांच्या घरात अचानक आगीचा भडका उडाला. घरातील विद्युत उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट (श्वाससर्किट) झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक दर्शनी समोर आले आहे. या आगीत घरातील फ्रीज आणि संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंगचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच रवींद्र गीते यांनी तातडीने अग्निशमन विभागाला फोनवरून कळविले. माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
वाहन चालक प्रकाश चव्हाण, प्रकाश कुमावत, फायरमन तेजस जोशी, संजय तायडे, भूषण पाटील या जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे ही आग शेजारील घरांपर्यंत पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. भरदुपारी लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.









