कासमवाडी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील कासमवाडी परिसरातील आठवडे बाजारात शनिवारी संध्याकाळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्युत कॉलनी परिसरातील रहिवासी असलेल्या बाली भरतसिंग राजपूत (वय ६२) या शनिवारी, ११ एप्रिल रोजी संध्याकाळी ५:३० वाजेच्या सुमारास कासमवाडी येथील आठवडे बाजारात गेल्या होत्या. बाजार करत असताना, गर्दीच्या ठिकाणी अज्ञात चोरट्याने मोठ्या हातचालाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून नेली. काही वेळाने पोत चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीला गेलेल्या सोन्याच्या पोतमध्ये सोन्याच्या वाट्या असून तिचे एकूण वजन २३.८९ ग्रॅम आहे. बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत ८३,२९५ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर फिर्यादी बाली राजपूत यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान टहकळे करत आहेत. शहरात गर्दीच्या ठिकाणी चोरटे सक्रिय असल्याने नागरिकांनी, विशेषतः महिलांनी दागिन्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









