जळगाव शहराजवळील घटना, शिरसोलीत शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन एका ४४ वर्षीय मेडिकल व्यावसायिकाने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भादली ते जळगाव दरम्यान रेल्वे खांब क्रमांक ४२२ जवळ (अप लाईन) रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

वासुदेव विठ्ठल बारी (बोडखे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भुसावळ-सुरत पॅसेंजर (गाडी क्र. १९००६) जात असताना चालकाला ट्रॅकवर एक व्यक्ती आल्याचे निदर्शनास आले. लोको पायलट पवार यांनी तातडीने या घटनेची माहिती जळगाव स्टेशन मास्तर यांना दिली. त्यानंतर स्टेशन मास्तरांनी जळगाव शनिपेठ पोलीस स्टेशनला कळवले.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता, त्यांच्या खिशात आधारकार्ड आणि पॅनकार्ड आढळून आले. त्यावरून मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. वासुदेव विठ्ठल बारी (वय ४४, मूळ राहणार शेंदुर्णी, सध्या राहणार शिरसोली प्र.न., इंदिरानगर पाण्याच्या टाकीजवळ) असे मृताचे नाव असून ते पेशाने मेडिकल व्यावसायिक होते.
मयत वासुदेव बारी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शिरसोली आणि शेंदुर्णी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत पाटील करीत आहेत.








