मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित
जळगाव (प्रतिनिधी):- शासकीय कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणणे, शासकीय कामकाजात पारदर्शकता वाढविणे तसेच नागरिकांना अधिक लोकाभिमुख व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या “सेवाकर्मी प्लस” या विशेष उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


या पुरस्काराचे वितरण मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. २८ मार्च रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित विशेष समारंभात करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मंत्री आशिष शेलार, पोलिस महासंचालक डॉ. सदानंद दाते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मिनल करनवाल यांना विशेष सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा परिषदेने शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन, तसेच नागरिकाभिमुख सेवा वितरणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या पुरस्कारामुळे जळगाव जिल्ह्याच्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, जिल्हा परिषदेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. तसेच, भविष्यातही नागरिकांना अधिक सक्षम व पारदर्शक सेवा देण्यास या सन्मानामुळे प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.









