एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ):- शहरातील हॉटेल आदित्याजवळील रिक्षा स्टॉपवर पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करून त्याला जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी हर्षल विनोद वाणी (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे २५ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास हॉटेल आदित्या समोरील बंगला चौकातील रिक्षा स्टॉपजवळ उभे होते. यावेळी संशयित आरोपी हर्षल विनोद वाणी (मजुरी काम करणारा) आणि कृष्णा सोनवणे (पबजी) हे दोघे दारूच्या नशेत त्या ठिकाणी आले.
“तू माझ्या भावाला मागच्या वेळी का मारहाण केली होती?” असा जाब विचारत आरोपींनी फिर्यादी हर्षल आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, आरोपीने आपल्या खिशातील चॉपरसारखे धारदार शस्त्र काढून हर्षलच्या पाठीवर वार केले. या हल्ल्यात हर्षल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकॉ. योगेश बेलदार हे करत आहेत. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.









