भव्य शोभायात्रेने अवघी ‘सुवर्णनगरी’ राममय!
जळगाव (प्रतिनिधी):- प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती, जळगाव महानगर तर्फे आज, गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ‘जय श्रीराम’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण जळगाव शहर राममय झाले होते. या सोहळ्यात हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोठा जल्लोष केला.


महाआरतीने झाला सोहळ्याचा प्रारंभ
शोभायात्रेची सुरुवात गोलाणी मार्केट येथील हनुमान मंदिरात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीराम आणि हनुमान रायाची भावपूर्ण महाआरती करण्यात आली. आरतीनंतर ढोल-ताशांच्या कडकडाटात शोभायात्रेला प्रारंभ झाला. गोलाणी मार्केटपासून निघालेली ही रॅली शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.
पारंपारिक वेशभूषा अन् विद्यार्थ्यांचे आकर्षण
यावर्षीच्या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध ऐतिहासिक आणि पौराणिक वेशभूषा केलेले शालेय विद्यार्थी होते. कुणी राम, कुणी लक्ष्मण तर कुणी हनुमानाचे रूप धारण करून रॅलीत सहभागी झाले होते. महिला आणि पुरुषांनी पारंपरिक मराठी पेहराव, नऊवारी साड्या आणि फेटे परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढवली. हातात भगवे ध्वज आणि ‘राम नाम’चा जप करत तरुण-तरुणींनी दिमाखात सहभाग घेतला.
मान्यवरांच्या उपस्थितीने वाढला उत्साह
या सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यात प्रामुख्याने आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमा भोळे, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक सागर शिंदे, पवन देसले तसेच नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, विजय बांदल, पियुष कोल्हे, सागर सोनवणे, गायत्री राणे, निलेश तायडे, अमित काळे, उज्वला बेंडाळे यांच्यासह ललित चौधरी, सुनील भंगाळे आणि राधेश्याम कोगटा आदी उपस्थित होते.
शिस्तबद्ध नियोजन आणि सुरक्षा
शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या, तर अनेक सामाजिक संस्थांकडून भाविकांसाठी पाणी आणि अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या सोहळ्याने जळगावकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.










