ओम आणि त्याच्या भावाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च जैन फाऊंडेशन करणार
जळगाव, (प्रतिनिधी) – पोहता येत नसतानाही अनेर नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या चौघासाठी उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय 14 ) हा देवदूत ठरला आहे. ओम याच्या धाडसामुळे चौघांचे प्राण वाचले. ओम याच्या या धाडसाची दखल घेत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आज (२५ मार्च) ओम पाटील याचा व त्याचा परिवाराचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ओम याच्या भावाचाही शैक्षणिक खर्च उचलण्याचा निर्णय अशोक जैन यांनी जाहीर केला.


अनेर नदीत गणपूर ( चोपडा ) येथील चार अल्पवयीन मुले ( वय 16 ) आंघोळीसाठी उतरले होते. त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. मुलांची आरडाओरड ऐकताच जवळच असलेल्या ८ वीत शिकणाऱ्या ओमने क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी घेतली. आपल्या जिगरबाज वृत्तीने त्याने एकामागून एक अशा चौघांनाही सुखरूप बाहेर काढले. त्याच्या या अचाट धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जैन इरिगेशनच्या भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने ओम याचा सर्व शैक्षणिक खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर २५ मार्च रोजी त्याला जैन हिल्स येथे बोलवून त्याचा व आई-वडिलांचा सत्कार केला. यावेळी सोबत परिवारातील सदस्य व अॅड. बाळकृष्ण पाटील ही होते. अशोक जैन यांनी ओम याच्या पालकांशी संवाद साधत त्याच्या धाडसाचे कौतूक केले. ओम याचा भाऊ दिवेश हा अकरावीत शिक्षण घेत आहे, त्याचाही शैक्षणिक खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला. ” ओमचे धाडस अफाट आहेच, पण त्याच्यावर झालेले संस्कार त्याहून मोठे आहेत,” अशा शब्दांत अशोक जैन यांनी त्याचे कौतुक केले.
ओम आठवीच्या वर्गात शिकत आहे. ओमचे वडील रवींद्र पाटील आणि आई सरलाबाई हे शेतमजुरी करतात. त्याची परिस्थिती साधारण आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणाची त्यांना चिंता होती. परंतु भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय घेतल्या गेल्यामुळे पाटील दाम्पत्यांनी समाधान व्यक्त केले.
फोटो ओळी- ओम पाटील याचा सत्कार करताना अशोक जैन, सोबत अॅड. बाळकृष्ण पाटील, स्वरुप लुंकड, रवींद्र पाटील, सरला पाटील व इतर.









