जळगावच्या निमखेडी शिवारात २.४० लाखांचा ऐवज लंपास
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील निमखेडी रोडवरील स्वामी पार्क परिसरात एका सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ४० हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


मगन वनाजी मोहिते (वय ६२, रा. स्वामी पार्क, विठ्ठल मंदिराजवळ, निमखेडी रोड) हे सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. दि. २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते पत्नीसह मूळ गावी (होळनांथे, ता. शिरपूर) शेतीच्या कामासाठी गेले होते. दरम्यान, त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला.
आज दि. २३ मार्च रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वैशाली भोसले यांनी मोरे यांच्या पत्नीला फोन करून माहिती दिली की, तुमच्या घराचा दरवाजा उघडा दिसत आहे. माहिती मिळताच मोरे कुटुंबीय तातडीने जळगावला पोहोचले. त्यांनी पाहिले असता घराच्या दरवाजाचा कोंडा तुटलेला होता आणि घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते.
चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधून मुद्देमाल लंपास केला आहे. एकूण २,४०,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली असून, जळगाव तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान यापूर्वी देखील मगन मेहेते यांचे घर दोन वेळा चोरट्यांनी लक्ष केले आहे. चोरट्यांच्या या कारनाम्यामुळे पोलिसांच्या गस्तीचे पितळ उघडे पडले आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांची गस्त वाढली पाहिजे अशी अपेक्षा आता नागरिकांमधून जोर धरत आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाळूमाफीया आणि घरफोडी करणारे चोर यांचा आता सुळसुळाट झाला असून त्यांच्यावर वचक निर्माण व्हावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त झाली आहे.









