जळगाव शहरात निमखेडी शिवारातील घटना
जळगाव तालुक्यातील निमखेडी गावात कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने लोखंडी विळाने पत्नीवर पोटावर आणि मानेवर वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. संशयित आरोपी हा स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जमा झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

दिपाली नितीन सोनवणे (वय 28 रा. निमखेडी ता. जळगाव) मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. दिपाली सोनवणे या पती नितीन विजय सोनवणे (वय ३५) आणि दोन मुलं आणि एक मुलगी यांच्या सोबत वास्तव्याला होत्या. हात मजुरी काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. त्यांच्यात काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होता. शुक्रवारी १९ मार्च रोजी दुपारी पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला.
या वादात संतापाच्या भरात संशयित आरोपी नितीन सोनवणे याने लोखंडी विळ्याने पत्नी दिपाली सोनवणे यांच्या गळ्यावर आणि पोटावर गंभीरित्या वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपी हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि फॉरेन्सिक कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मयतच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेसंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.








