जळगावात कुरिअरचे पार्सल लंपास
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, आकाशवाणी चौकातील श्री स्वामी ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोरून कुरिअरचे बॉक्स चोरट्याने पळवल्याची घटना उघडकीस आली आहे. या बॉक्समध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे ५ महागडे मोबाईल होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी भूषण रमेश पाटील (वय ३०, रा. पंढरपूर नगर, जळगाव) हे कुरिअर सेवा पुरवण्याचे काम करतात. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:२४ वाजेच्या सुमारास,आकाशवाणी चौकातील श्री स्वामी ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोर त्यांनी कुरिअरचे बॉक्स ठेवले होते. या दरम्यान, कोणातरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची नजर चुकवून ५ मोबाईल असलेले कुरिअरचे बॉक्स लंपास केले.
या चोरीबाबत भूषण पाटील यांनी १४ मार्च रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेश सोनवणे हे करीत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे कुरिअर कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.









