जळगावात नात्याला काळिमा फासणारी घटना
जळगाव (प्रतिनिधी):– शहरात माणुसकीला आणि नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. रामेश्वर कॉलनी परिसरात एका ३१ वर्षीय महिलेला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिला ही जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवासी आहे. १३ मार्चच्या रात्री ११:३० ते १४ मार्चच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडितेचे नातेवाईक असलेल्या दोन आरोपींनी तिला रामेश्वर कॉलनीतील एका घरात गाठले. यावेळी आरोपी राजेश शिवराम पवार याने पीडितेला गुंगीचे पेय पाजले. त्यानंतर शुद्ध हरपलेल्या अवस्थेत असताना राजेश पवार आणि आरोपी राजेंद्र शंकरसिंह पवार या दोघांनी पीडितेच्या संमतीशिवाय तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
पीडित महिलेने या अत्याचाराविरोधात स्वतः फिर्याद दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना सपोनि माधुरी बोरसे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत आरोपी राजेश शिवराम पवार याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश वाघ करत आहेत. जळगाव जिल्ह्यात या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.









