वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी शिवारात पकडले
वरणगाव (वार्ताहर) :- परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे. वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑर्डनन्स फॅक्टरी शिवारात ही कारवाई करण्यात आली.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शुक्रवार दि. १३ मार्च २०२६ रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास ऑर्डनन्स फॅक्टरी शिवारातील परिसरात एक इसम संशयास्पदरित्या फिरत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना शस्त्र आढळून आले. पोलीस पथकाने आरोपीकडून एकूण २७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, त्यात २५ हजार रुपये किमतीचा सिल्व्हर रंगाचा गावठी कट्टा, २ हजार रुपये किमतीचे दोन पितळी जिवंत राऊंड आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी संजय गोपाळ चंदेले (वय ५०, रा. साईबाबा नगर, दर्यापूर, वरणगाव) याला अटक केली आहे. जनमानसात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याने हे शस्त्र बाळगल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक श्रीकृष्ण खंडेराव देशमुख (वय ४५) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार प्रतापसिंग बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल यासिन पिंजारी करत आहेत.









