चाळीसगाव तालुक्यातील तरुणावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी):- चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एका २३ वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील रहिवासी असलेला संशयित आरोपी कल्पेश दादाभाऊ पाटील (वय २३) याने १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पीडित मुलीला चाळीसगाव-धुळे रोडवरील हॉटेल येथे वारंवार नेले. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही, तिच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन संशयित आरोपीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
संशयित आरोपीने केलेल्या या कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. या गंभीर प्रकारानंतर पीडितेने १३ मार्च २०२६ रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती कथन केली. पीडितेच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात आरोपी कल्पेश पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करत आहेत.









