धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगरातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी): शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, कृष्ण गीता नगर भागातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना ७ मार्चच्या रात्री ते ८ मार्चच्या सकाळ दरम्यान घडली.
फिर्यादी किरण प्रल्हाद विसपुते (वय ४५, रा. कृष्ण गीता नगर, धरणगाव) या आपल्या परिवारासह नाशिक येथे लग्नासाठी गेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ८ मार्च रोजी सकाळी विसपुते कुटुंब घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने धरणगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.


चोरट्यांनी एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि धरणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि प्रशांत कंडाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहेत. शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









