समस्या लवकरच सोडवणार – ना. गुलाबराव पाटील
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील उमाळा–नशिराबाद परिसरात विविध औद्योगिक कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्या नियमितपणे लाखो रुपयांची वीजबिले भरत असतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांना कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे कर्जफेड व कामगारांचे पगार कसे करावेत, या चिंतेत कंपनीचे मालक आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन लढ्ढा यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन उद्योजकांची व्यथा मांडली.



त्यानंतर ही समस्या लवकरच सोडविण्यात येईल, असे आश्वासन ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. यावेळी राजीव बियाणी, हरीश जोशी, मुकेश दहाड, ललित लढ्ढा, तुषार पाटील, गजेंद्र मराठे, नरेश बागडे आदी उद्योजक उपस्थित होते.
उमाळा येथील कंपन्यांनी वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडितमुळे झालेल्या नुकसानीबाबत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना अनेक वेळा निवेदन दिले, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. यावेळी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, ही समस्या तातडीने सोडवून चिंचोली उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. तसेच ५ केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल आणि कंपन्यांचे नुकसान टळेल.
उद्योजकांकडून ना. गुलाबराव पाटील यांचे आभार
उमाळा–नशिराबाद परिसरातील कंपन्यांसाठी चिंचोली येथील महावितरण उपकेंद्रात ३२ केव्ही ट्रान्सफॉर्मरसाठी निधी मंजूर करून काम सुरू करण्यात आले होते. आता पुन्हा ५ केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार असल्याने वारंवार होणारे ट्रिपिंग थांबेल व उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळेल. त्यामुळे उद्योजकांनी ना. गुलाबराव पाटील यांचे शब्दसुमनांनी आभार मानले.









