विज्ञान प्रश्नमंजुषा, रांगोळी व वकृत्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
शिरसोली (प्रतिनिधी) – बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरसोली येथे २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बारी, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, अशोक बावस्कर, सुनील भदाणे व भरत बारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञान रांगोळी, विज्ञान वकृत्व तसेच पोस्टर स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करत प्रभावी मनोगते व्यक्त केली.
विज्ञान शिक्षक भरत बारी यांनी डॉ. रमन यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला, तर पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक मार्गदर्शन केले. शिक्षक रजनीकांत अस्वार व पुनम लावणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपाली पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आशा कोळी व देवका पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन आकांक्षा निकम यांनी मानले. विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









