यशोधन पार्क परिसरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी):- शहरातील यशोधन पार्क परिसरात मध्यरात्री रक्ताचा थरार पाहायला मिळाला. केवळ वेळ विचारण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एका ४७ वर्षीय तरुणाला आपली जीव गमवावा लागला. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मयत अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४७, रा. आनंदनगर) हे २७ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास यशोधन पार्कजवळील एका हेअर सलूनसमोर मित्रांसोबत बसले होते. यावेळी आरोपी रोहित पुरुषोत्तम भावसार (रा. नेब कॉलनी) हा देखील त्या ठिकाणी आला. दोघेही दारूच्या नशेत असताना त्यांच्यात ‘वेळ विचारण्यावरून’ शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर झटापटीत झाले आणि आरोपीने अनिल यांना बेदम मारहाण केली.
मारहाणीदरम्यान अनिल सावकारे जमिनीवर पडले असता, आरोपीने त्यांच्या छातीवर बसून हातातील कड्याने आणि जवळच असलेल्या झाडाची कुंडी डोक्यावर दोन-तीन वेळा जोराने आदळली. या भीषण हल्ल्यात अनिल यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घाबरलेल्या रोहित भालेराव या प्रत्यक्षदर्शीने रात्री १ वाजेच्या सुमारास मयताचे मोठे बंधू भागवत सावकारे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता अनिल सावकारे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. भागवत सावकारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रोहित भावसार विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे आणि भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.









