जामनेर तालुक्यातील पहूर येथील घटना
पहूर (प्रतिनिधी):- छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेले मजूर ईश्वर भानुदास सोनवणे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक शाम यादव चौधरी (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

सोमवारी दुपारी सुमारे ४:१५ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ७५ वरील साई हॉटेलसमोर ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत ईश्वर सोनवणे आणि शाम चौधरी हे शेतातून मका कापणीचा सौदा करून घरी परतत होते. त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच १९, डीबी २१५०) भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच २०, सीटी ८०५३) मागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी हवेत सुमारे ७ ते १० फूट उंच उडाली. याच दरम्यान ट्रकने समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीस्वारालाही धडक दिली. मात्र, त्या दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखून वेळीच उडी घेतल्याने त्याचे प्राण थोडक्यात वाचले.
अपघातानंतर महामार्गावरील सद्दाम शेख व सचिन पाटील यांनी जखमींना तात्काळ पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी शाम चौधरी यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात करून पळून जाणाऱ्या ट्रक चालकाचा इम्रान भाई या रिक्षाचालकाने पाठलाग केला आणि त्याला मेट्रो वाईंन शॉपजवळ पकडून दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.









