मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची माहिती
जळगाव ( प्रतिनिधी ) –शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदांवर पदोन्नती मिळवण्यासाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १९ जानेवारी रोजी महत्वपूर्ण आदेश निर्गमित केले असून, त्याबाबतची माहिती जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली.

पदोन्नतीसाठी ‘हे’ शिक्षकच ठरणार पात्र
शासकीय निर्णयानुसार, ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण केली आहे आणि पदोन्नतीसाठी आवश्यक असणारी इतर सर्व अर्हता पूर्ण केली आहे, केवळ असेच शिक्षक आता पदोन्नतीसाठी पात्र मानले जाणार आहेत. ज्या शिक्षकांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही, त्यांना तूर्तास पदोन्नती दिली जाणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम
माजी काळात सर्वोच्च न्यायालयाने (सिव्हील अपील क्र. १३८५/२०२५) दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या एका न्यायनिर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) आणि केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवले होते.
या निर्णयामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील पदोन्नतीच्या प्रक्रियेत आता टीईटी पात्रतेचा निकष अत्यंत कळीचा ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्वाचे मुद्दे
अधिन राहून निर्णय: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, दोन वर्षांच्या कालावधीत टीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहूनच पुढील कार्यवाही केली जाईल.
कोणत्या पदांना नियम लागू: पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) आणि विस्तार अधिकारी (शिक्षण) या सर्व पदांच्या पदोन्नतीला हा नियम लागू असेल.
कायदेशीर सल्ला: शिक्षण विभागाने हा निर्णय विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार (दि. ६ जानेवारी २०२६) जाहीर केला आहे.









