धरणगाव तालुक्यात १७ वर्षीय पीडिता ४ महिन्यांची गरोदर
धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील एका गावात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने बालविवाह लावून दिल्यानंतर, तिच्यावर झालेल्या अत्याचारामुळे ती चार महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह दोन्ही कुटुंबांतील सदस्यांविरुद्ध पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी ममता (वय १७, नाव बदललेले आहे) ही अल्पवयीन असल्याचे माहित असूनही, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी एका गावात तिचा विवाह सदाशिव सपकाळे (वय ३२) याच्याशी लावून देण्यात आला. हा विवाह लावून देण्यात पीडितेचे आई-वडील आणि आरोपीचे आई-वडील यांचा मुख्य सहभाग होता. लग्नानंतर आरोपी सदाशिव याने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले, ज्यातून पीडिता सध्या चार महिन्यांची गरोदर आहे.
पीडितेच्या प्रसूतीपूर्व तपासणी दरम्यान ती अल्पवयीन असल्याचे कायदेशीररित्या समोर आले. या गंभीर प्रकाराची दखल घेत, ठाणे येथील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणाली प्रभाकर शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मुलीचे लग्नाचे कायदेशीर वय (१८ वर्षे) पूर्ण नसतानाही हा विवाह लावून दिल्याने कायद्याचे उल्लंघन झाले आहे. या गुन्ह्यात पती सदाशिव सपकाळे याच्यासह दोन्ही बाजूंच्या पालकांचा समावेश आहे. या घटनेमुळे धरणगाव परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत कंडारे करत आहेत.









