मध्य रेल्वे आरपीएफची मोठी कारवाई
नाशिक (वृत्तसेवा) : वंदे भारत एक्स्प्रेससारख्या हाय-प्रोफाईल ट्रेनमध्ये साप सोडून प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या नराधमाला दीड महिन्यांनी अटक करण्यात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाला (RPF) यश आले आहे.या धक्कादायक घटनेतील आरोपीला मुंब्रा येथून दि. १२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे.


दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी संख्या २२२२५) मधील कोच सी-१६ च्या स्वच्छतागृहात एक साप आढळून आला होता. यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. रेल्वे प्रशासनाने तत्काळ स्वच्छतागृह बंद करून सोलापूर स्थानकावर सापाला सुरक्षितपणे बाहेर काढले होते. या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक अज्ञात व्यक्ती स्वच्छतागृहात साप सोडताना स्पष्टपणे दिसून आली होती. रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास लावून १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंब्रा येथून आरोपीला ताब्यात घेतले.
जगन अर्जुन भाले (वय ३७, रा. जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपी जगन भाले याच्यावर रेल्वे अधिनियम, १९८९ च्या कलम १४५(बी), १४७ आणि १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कल्याण येथील रेल्वे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
“रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. आरपीएफने अत्यंत सतर्कतेने या प्रकरणाचा तपास करून आरोपीला जेरबंद केले आहे,” असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.









