जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाजवळ घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील कोर्ट चौक ते गोलाणी मार्केट दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिला जखमी झाली असून, दुचाकीस्वाराविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रिना अरुण चौधरी (वय ४०, रा. जमुना नगर, जुना खेडी रोड) या २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६:१० वाजेच्या सुमारास कामानिमित्त शहरात आल्या होत्या. कोर्ट चौकाकडून त्या गोलाणी मार्केटच्या दिशेने पायी जात असताना, जी.एस. मैदानाची संरक्षक भिंत आणि फूल विक्रीच्या दुकानासमोरून त्या रस्ता ओलांडत होत्या. यावेळी गोलाणी मार्केटच्या दिशेकडून येणाऱ्या एमएच १९ डीडी ४४३८ दुचाकीने रिना चौधरी यांना जोराची धडक दिली. दुचाकीस्वार ऋषिकेश दत्तात्रय पाटील याने आपली दुचाकी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवल्याने ही धडक बसली. या अपघातात रिना चौधरी यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातानंतर उपचार घेतल्यानंतर रिना चौधरी यांनी १२ फेब्रुवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार ऋषिकेश पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप यशवंत पाटील करत आहेत. भरवस्तीत आणि गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या अपघातामुळे वाहनधारकांच्या वेगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.









