मुक्ताईनगरजवळ हायवेवर भीषण अपघात
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हरताळा गावाजवळील पुलावर गुरुवारी दुपारी एक भीषण रस्ता अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या इनोव्हा कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

फिर्यादी प्रवीण जगन्नाथ गायकवाड (रा. मालेगाव, जि. नाशिक) हे आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (क्र. एमएच ४१ सी ५२९०) ने जात असताना, दुपारी १ वाजेच्या सुमारास हरताळा गावाजवळील पुलावर समोरून येणाऱ्या दुचाकीने (क्र. एमपी ६८ झेड ए ६७२५) त्यांना जोरदार धडक दिली. दुचाकी चालक उमर रफिक खान (रा. लालबडल्ली, मध्यप्रदेश) हा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने अतिशय भरधाव वेगात दुचाकी चालवत होता. या भीषण धडकेत दुचाकीवर मागे बसलेले राजू शामा मावसकर (वय ४०, रा. लालबडल्ली, जि. बुऱ्हाणपूर) यांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच दुचाकीवरील महिला प्रवासी ननकीबाई सुभाष मावसकर या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी कार चालक प्रवीण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चालक उमर रफिक खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप वानखेडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अपघातातील दोषी दुचाकी चालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे हा जीवघेणा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









