अमळनेर तालुक्यात निंभोरा येथे घटना
अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील निंभोरा येथे शिवीगाळ करू नका, असे सांगणाऱ्या एका ४३ वर्षीय व्यक्तीवर गावातीलच दोन तरुणांनी चाकू आणि फायटरने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद बापुराव सैंदाणे (वय ४३) हे १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जेवण करून आपल्या घराच्या अंगणात बसले होते. यावेळी त्यांच्या अंगणात पत्नी आणि वहिनी भांडी घासत होत्या. घरासमोरच्या रस्त्यावर गावातीलच कृष्णा बाळू भिल्ल आणि रोहित अरुण वाघ हे दोघे मोठ्याने ओरडून शिवीगाळ करत उभे होते.
अंगणात स्त्रिया बसलेल्या असल्याने प्रमोद सैंदाणे यांनी त्यांना दुसरीकडे जाऊन शिवीगाळ करण्यास सांगितले. याचा राग आल्याने कृष्णा भिल्ल याने खिशातील चाकू काढून सैंदाणे यांच्यावर वार केला. हा वार अडवताना त्यांच्या उजव्या हाताच्या तळव्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर कृष्णाने दुसऱ्या खिशातील ‘फायटर’ काढून सोंडाणे यांच्या कपाळावर जोरात मारला, ज्यामुळे रक्तस्त्राव सुरू झाला. त्याचा मित्र रोहित वाघ यानेही सोंडाणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. गोंधळ ऐकून प्रमोद यांच्या पत्नी पूनम आणि वहिनी नीलिमा यांनी मध्यस्थी करत त्यांना वाचवले.
यावेळी “आमच्या नादाला लागला तर तुझा काटा काढू,” अशी जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले. जखमी प्रमोद सैंदाणे यांना तातडीने मारवड पोलिसांकडे नेण्यात आले, तिथून त्यांना अमळनेर येथील खासगी रुग्णालयात (नर्मदा हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रमोद सैंदाणे यांच्या तक्रारीवरून मारवड पोलिसांनी आरोपी कृष्णा बाळू भिल्ल आणि रोहित अरुण वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सपोनि जिभाऊ तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे. कॉ. संजय श्रावण पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









