मनसेचा महापालिकेला ४८ तासांचा अल्टिमेटम, स्वतः जेसीबी आणून नाल्याचे रुंदीकरण करण्याचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी)- पिंप्राळा परिसरातील सोनी नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नाल्याच्या रुंदीकरणाच्या प्रश्नावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. प्रल्हाद नगरमधून येणाऱ्या नाल्याची रुंदी चैतन्य किराणा स्टोअर्ससमोर अवघ्या दोन फुटांपर्यंत संकुचित झाल्याने परिसरात सांडपाण्याचे साम्राज्य पसरले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अभियंता योगेश बोरोले यांची भेट घेऊन त्यांना खरमरीत निवेदन दिले.

प्रल्हाद नगरकडून येणाऱ्या या नाल्याची मूळ रुंदी ८ फूट आहे. मात्र, सोनी नगरमधील चैतन्य किराणा दुकानासमोर हा नाला अचानक २ फुटांचा होतो. एका मोठ्या प्रवाहाचा गळा अशा प्रकारे घोटल्यामुळे तिथे पाण्याचा ‘बॉटलनेक’ तयार झाला आहे. परिणामी, नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरात शिरत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांची साथ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
स्थानिक रहिवाशांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही. पावसाळा नसतानाही ही परिस्थिती असेल, तर पावसाळ्यात घरांची पडझड होण्याची शक्यता निवेदनात वर्तवण्यात आली आहे.
निवेदन देताना मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, “आता चर्चा नको, कृती हवी” पुढील ४८ तासांत जर नाल्याच्या रुंदीकरणाचे मोजमाप होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही शासकीय परवानगीची वाट न पाहता स्वतः जेसीबी आणून नाल्याचे रुंदीकरण करेल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि सोनी नगर परिसरातील संतप्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा, चेतन पवार, विशाल सोनार, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, पत्रकार नरेश बागडे, भीमराव सोनवणे, अजय राणा, ममता राणा, सुनिता भोई. ममता शिंदे, गणेश सुपेकर, आदी रहिवासी उपस्थित होते.









