पोलीस निरीक्षकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दिली धमकी
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषद सदस्य एकनाथराव गणपतराव खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे आणि धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३१ ते १२:४५ च्या सुमारास ही घटना सावदा पोलीस स्टेशनच्या आवारात घडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पुंडलीक पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, एकनाथ खडसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन “तुम्ही तासखेडा येथील गौण खनिजाचा गुन्हा का दाखल केला नाही?” असा जाब विचारत पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद शब्द वापरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप लावतो” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीत पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, खडसे यांनी सावदा पोलीस ठाण्यातील एका जुन्या गुन्ह्याच्या संदर्भात शासनाच्या मंत्र्यांचा उल्लेख करून त्यांनाही मोठ्या आवाजात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. सावदा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
स.पो.नि. विशाल पुंडलीक पाटील (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. तपास केदार बारबोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ) करीत आहेत. पोलीस स्टेशन परिसरात सध्या शांतता असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









