जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळातर्फे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेने श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळ्याची सांगता रविवारी झाली. यावेळी नरहरी विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. यात प्रथम पूजा, आरती, भजन, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता संभाजीनगर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित टाक व दंतचिकित्सक डॉ. अश्विनी टाक यांचे ‘नैराश्य व त्यावरील घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन उपस्थित समाज बांधवांना लाभले. याप्रसंगी समाजातील गुणवंत व विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सूत्रसंचालन सोनाल कपोते यांनी केले. यात मावळते अध्यक्ष ॲड. कैलास सोनार यांच्या अध्यक्षीय कार्याचा आढावा माजी अध्यक्ष सुनील कपोते यांनी सभेसमोर मांडला असता उपस्थित समाज बांधवांनी टाळ्यांच्या गजरात मावळत्या अध्यक्षांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या सभेत पुढील तीन वर्षाकरिता श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय प्रभाकर सोनार तर उपाध्यक्षपदी राजेंद्र अरुण पल्लीवाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी मावळते अध्यक्ष व ॲड. कैलास बाळकृष्ण सोनार यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन औपचारिक पदभार दिला.
सर्व निवड प्रक्रिया सर्वानुमते व शांततेत होण्याकरिता माजी अध्यक्ष सुनील कपोते तसेच मंडळाचे सल्लागार रवींद्र डहाळे व नरेंद्र रघुनाथ सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे सर्व स्तरातून शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.











