अमळनेर शहरातील घटना
अंमळनेर ( प्रतिनिधी ) –बिर्याणी खाऊ घातली नाही या किरकोळ कारणावरून एका १६ वर्षीय मुलावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना अंमळनेर शहरात घडली आहे. याप्रकरणी अंमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.


फिर्यादी कार्तिक दिनेश धाप (वय १६, रा. कोष्टीवाडा, अंमळनेर) हा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:१० च्या सुमारास आपल्या मित्रासोबत फरशी पुलाजवळील ‘शिवशक्ती’ दुकानापाशी सोयाबीन बिर्याणी खाण्यासाठी गेला होता. यावेळी तेथे बसलेला संशयित आरोपी कृष्णा ऊर्फ ‘अंडा पाव’ बि-हाडे याने कार्तिकला पाहून “मला सोयाबीन बिर्याणी खाऊ घाल, नाहीतर तुला बघून घेईन,” अशी धमकी दिली. कार्तिकने “सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, मी तुला नंतर कधीतरी खाऊ घालेन,” असे नम्रपणे सांगितले. मात्र, या उत्तराने संतापलेल्या कृष्णाने कार्तिकला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
रागाच्या भरात संशयित आरोपीने प्रथम कार्तिकला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आपल्या जवळील एका तीक्ष्ण हत्याराने कार्तिकच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर जोरदार वार केला. या हल्ल्यात कार्तिक गंभीर जखमी झाला असून रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी उपस्थित असलेल्या राजेश चंदांनशिव आणि सुमित पाटील या मित्रांनी मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.
भांडण सोडवल्यानंतरही आरोपी कृष्णा बि-हाडे याने “तुला आता जास्त झाले आहे, मी तुला सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी कार्तिक धाप याने दिलेल्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









