भुसावळ रेल्वे विभागाची मोठी कारवाई
भुसावळ ( प्रतिनिधी ) – रेल्वेने प्रवास करताना विनातिकीट आणि अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्यांविरुद्ध भुसावळ विभागाने मोहिमेचा बडगा उगारला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत (एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६) विभागाने अशा प्रवाशांकडून ६८ कोटी ८६ लाख रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दंडाच्या रकमेत तब्बल ६१ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.


भुसावळ विभागाच्या तिकीट तपासणी पथकाने या काळात एकूण ८.१८ लाख प्रकरणांवर कारवाई केली. गेल्या वर्षी (२०२४-२५) ही संख्या ५.८२ लाख इतकी होती. म्हणजेच कारवाईच्या प्रमाणात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेल्वेने राबवलेल्या प्रभावी नियोजनामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी विभागाने ‘मल्टी-लेव्हल’ धोरण अवलंबले आहे.
भुसावळ विभागाने प्रवाशांना सन्मानाने आणि वैध तिकिटासह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी तिकीट खिडकी, ATVM मशीन, ‘यूटीएस’ मोबाईल ॲप किंवा IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावरूनच तिकीट खरेदी करावे, जेणेकरून दंडात्मक कारवाई आणि मनस्ताप टाळता येईल.
“सन्माननीय प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विनातिकीट प्रवासावर आमची करडी नजर असून अशा मोहिमा यापुढेही तीव्रपणे राबवल्या जातील.”
— रेल्वे प्रशासन, भुसावळ विभाग









