पाण्यासाठी तळेगावच्या रणरागिणी आक्रमक, घाणीचे साम्राज्य व अस्वच्छतेमुळे ग्रामस्थ संतप्त
चाळीसगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील तळेगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांचा संयम अखेर सुटला. गेल्या महिनाभरापासून नळांना पाणी न आल्याने संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत कार्यालयाला टाळे ठोकून जोरदार निदर्शने केली. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि दुर्लक्षामुळे गावकरी संतप्त झाले असून, जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा महिलांनी घेतला आहे.


तळेगाव येथे गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना उन्हातान्हात मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. घरगुती वापरासाठी पाणी नसल्याने दैनंदिन कामकाज ठप्प झाले असून, स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही केवळ आश्वासनेच मिळत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला.
केवळ पाणीच नाही, तर गावात इतर मूलभूत सुविधांचाही बोजवारा उडाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील महिला शौचालयांची दुरवस्था झाली असून गटारीचे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने या अस्वच्छतेकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे.
महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. “आमच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जागा करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे,” असे आंदोलक महिलांनी सांगितले. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने गावात येऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.









