यावल-रावेर रस्त्यावर भीषण घटना
यावल (प्रतिनिधी):- यावल-रावेर रस्त्यावरील बालाजी इंडस्ट्रीजजवळ झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अकिलेश उर्फ गोलू अविनाश कोळी (रा. महाराणा प्रताप नगर, यावल) असे मृत तरुणाचे नाव असून, शनिवारी ७ फेब्रुवारी पहाटे जळगाव येथील खाजगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.


दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास अकिलेश हा आपल्या ताब्यातील पल्सर मोटरसायकलने (क्रमांक: एमएच १९ डिक्यू ३७०६) रावेरकडून यावलकडे येत होता. यावल शिवारातील बालाजी इंडस्ट्रीजजवळील वळणावर एका अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन हयगयीने आणि भरधाव वेगाने चालवून अकिलेशच्या दुचाकीला कट मारला. या धडकेमुळे अकिलेश दुचाकीवरून फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली होती.
याप्रकरणी रामदास भगवान कोळी (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर अकिलेशवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. मृत अकिलेशच्या पश्चात केवळ त्याची आई असून, तरुण मुलाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अद्याप अज्ञात वाहन चालकाचा शोध लागलेला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.









