इंद्रप्रस्थ नगरात भाविकांची अलोट गर्दी
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात सध्या सर्वत्र संत श्री गजानन महाराज प्रकट दिनोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. यानिमित्ताने इंद्रप्रस्थ नगर येथे आयोजित विशेष कार्यक्रमांतर्गत ह.भ.प. देवदत्त मोरदे महाराज यांच्या अमृतवाणीतून ‘शिव महापुराण’ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी, ६ फेब्रुवारी रोजी कथेच्या पुष्पामध्ये महाराजांनी शिवचरित्रातील गूढ रहस्यांचे उलगडा केला, ज्याचा लाभ घेण्यासाठी शेकडो भाविकांनी परिसरात गर्दी केली होती.


कथेचे निरूपण करताना देवदत्त मोरदे महाराज म्हणाले की, शिव महापुराण हे केवळ एक शास्त्र नसून, मानवी जीवनातील क्लेश दूर करून शांती देणारा एक मार्ग आहे. जसा गजानन महाराजांनी ‘गण गण गणात बोते’ या मंत्रातून चराचरात परमेश्वर पाहण्यास शिकवले, तसेच भगवान शिव हे त्या चराचराचे मूळ आहेत.
भक्तीमध्ये जेव्हा ‘स्व’चा त्याग होतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवाची प्राप्ती होते. शिव हे कल्याणाचे प्रतीक आहेत. या आध्यात्मिक सोहळ्याचे नेटके नियोजन उत्सव समितीद्वारे करण्यात आले आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव गणेश शेळके आणि उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी भाविकांच्या सुविधेसाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी समितीचे सदस्य योगेंद्र पवार, राजेंद्र डी. बडगुजर, सतीश वाणी, प्रकाश शेवाळे, डॉ. सोपान पाटील आणि सतीश भोसले यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. भक्तीमय वातावरणात सुरू असलेल्या या कथेने संपूर्ण इंद्रप्रस्थ नगर शिवमय झाले आहे.









