केंद्रीय अर्थसंकल्पात २० पटीने वाढ, तर १७ स्थानकांचे पुनर्वसन पूर्ण
मुंबई ( वृत्तसेवा ) – महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये गेल्या काही वर्षांत अभूतपूर्व बदल पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारने राज्याच्या रेल्वे बजेटमध्ये ऐतिहासिक वाढ केली असून, अनेक महत्त्वाचे प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत.


अर्थसंकल्पात २० पटीने वाढ
२००९ ते २०१४ या काळात महाराष्ट्रासाठी रेल्वेचा सरासरी वार्षिक अर्थसंकल्प केवळ १,१७१ कोटी रुपये होता. मात्र, २०२६-२७ च्या आकडेवारीनुसार, ही तरतूद आता तब्बल २३,९२६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही वाढ मूळ बजेटच्या तुलनेत २० पट अधिक आहे. राज्यात सध्या १,७०,०५८ कोटी रुपयांची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये नवीन रेल्वे मार्ग तयार करणे, स्थानकांचे आधुनिकीकरण आणि सुरक्षा वाढवणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. ‘अमृत स्टेशन’ योजनेतून स्थानकांचा कायापालट झाला आहे. ‘अमृत स्टेशन’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ स्थानकांची निवड करण्यात आली आहे.
स्थानक आधुनिकीकरणासाठी ५,६७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत १७ स्थानकांचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. यामध्ये लासलगाव, चिंचपोकळी, देवळाली, परळ, धुळे, वडाळा रोड, माटुंगा, केडगाव, लोणावळा जंक्शन, मूर्तिजापूर जंक्शन, शहादा, चांदा फोर्ट, आमगाव, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, बारामती आणि नांदुरा या स्थानकांचा समावेश आहे.
राज्यात प्रवाशांच्या सोयीसाठी प्रीमियम ट्रेन सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. वंदे भारत एक्सप्रेस: सध्या १२ जोड्या कार्यरत आहेत. अमृत भारत एक्सप्रेस: ५ जोड्या कार्यरत आहेत. २०१४ पासून रेल्वे जाळ्याचा विस्तार अत्यंत वेगाने झाला आहे. २०१४ पासून सुमारे २,४०० किमी नवीन ट्रॅक बांधण्यात आले आहेत, जे मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कपेक्षा जास्त आहेत. राज्याने रेल्वेचे १००% विद्युतीकरण साध्य केले असून ३,७४४ किमी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
रेल्वे सुरक्षेसाठी ‘कवच’ प्रणाली ५७६ किमीवर कार्यान्वित करण्यात आली असून, ४,९८१ किमीचे काम मंजूर झाले आहे. याशिवाय १,२२८ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे बांधकामही पूर्ण झाले आहे.









