माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील यांची प्रतिक्रिया
जळगाव ( प्रतिनिधी ) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला असून, यामध्ये भारताचा विकास दर ७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘विकसित भारत’ आणि जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात आरोग्य, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि संरक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील तथा भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केली आहे.


आरोग्य क्षेत्राप्रती संवेदनशीलता दाखवत सरकारने कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. कर्करोगाच्या १७ औषधांवरील मूलभूत सीमाशुल्क पूर्णपणे रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ७ दुर्मिळ आजारांवरील औषधे आता शुल्कमुक्त यादीत समाविष्ट केल्यामुळे सामान्य नागरिकांसाठी उपचार अधिक परवडणारे होतील. आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी देशात तीन नवीन ‘आयुर्वेदिक एम्स’ आणि वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी पाच विशेष वैद्यकीय केंद्रे स्थापन केली जाणार आहेत.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात दूरगामी तरतुदी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहांची उभारणी केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालये उभारली जातील. महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष विक्री केंद्रे स्थापन करण्यात येतील. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सरकारने १ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची विक्रमी तरतूद केली आहे. भांडवली खर्चावर भर देत नवीन शस्त्रे, ड्रोन, लढाऊ विमाने, आधुनिक तोफखाना आणि नौदलाच्या जहाजांची खरेदी करण्यात येणार आहे.
तसेच सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांच्या विकासावरही मोठी गुंतवणूक केली जाईल. करदात्यांसाठी आणि प्रशासकीय बदल आहे. आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसला तरी, करदात्यांना प्रशासकीय पातळीवर दिलासा देण्यात आला आहे. सुधारित रिटर्न भरण्यासाठी आता ३१ डिसेंबरऐवजी ३१ मार्चपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे.
“आरोग्य आणि मध्यमवर्गाला दिलेला दिलासा, तसेच ७ टक्के विकास दराचा अंदाज भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने नेणारा आहे.”
— डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार
“महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय, वसतिगृह आणि संरक्षणासाठी केलेली विक्रमी तरतूद या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे.”
— डॉ. केतकी पाटील, जिल्हा सरचिटणीस, भाजपा









