जळगाव महानगरपालिका निवडणूक

दुपारपर्यंत मतदानाचा टक्का घसरलेलाच; १:३० वाजेपर्यंत २२.४९ टक्के मतदान
जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळपासून सुरू असलेल्या मतदानात दुपारच्या सत्रात वाढ झाली असली, तरी मतदानाचा वेग अपेक्षेपेक्षा कमीच असल्याचे दिसून येत आहे. दुपारी १:३० वाजेपर्यंत शहरात एकूण २२.४९ टक्के मतदान झाले आहे.
सकाळी ११:३० वाजेपर्यंत शहरात १३.३९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत (दुपारी १:३० पर्यंत) मतदानाचा वेग काहीसा वाढला असून, या दोन तासांत ३९,९४३ नवीन मतदारांनी केंद्रावर हजेरी लावली. दुपारी १:३० वाजेपर्यंतची एकूण स्थिती : एकूण मतदान: ९८,६४१ (२२.४९%), पुरुष मतदार: ५४,१३२, महिला मतदार: ४४,५०९ असे आहे.
दोन तासांतील वाढीचे विश्लेषण
सकाळी ११:३० ते दुपारी १:३० या दोन तासांत झालेल्या मतदानाचा तपशील आहे. या दोन तासांत २०,८७५ पुरुष मतदारांनी मतदान केले.
महिला मतदारांच्या संख्येतही वाढ झाली असून, १९,०६८ नवीन महिला मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळच्या सत्रात महिलांची संख्या कमी होती, मात्र दुपारी महिलांचा टक्का पुरुषांच्या बरोबरीने वाढताना दिसत आहे.
दुपारी १:३० पर्यंत केवळ २२.४९ टक्के मतदान झाल्याने राजकीय गोटात चिंतेचे वातावरण आहे. थंडी ओसरल्यानंतर मतदानासाठी मोठ्या रांगा लागतील असा अंदाज होता, मात्र अद्यापही मतदान केंद्रांवर फारशी गर्दी दिसून येत नाहीये. आता शेवटच्या टप्प्यात म्हणजेच दुपारी ३:३० ते ५:३० या वेळेत मतदानाचा टक्का किती वाढतो, यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. प्रशासनाकडून मतदारांना घराबाहेर पडण्याचे आवाहन वारंवार केले जात असून, सायंकाळच्या सत्रात नोकरदार वर्ग आणि तरुणांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.









