जळगाव एमआयडीसी परिसरात घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव-संभाजीनगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धाला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला असून, धडक दिल्यानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत विनायक काशिनाथ शिंपी (वय ६५, रा. कुसुंबा, ता. जि. जळगाव) हे ९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगाव-संभाजीनगर हायवेवरील हॉटेलसमोरून रस्ता ओलांडत होते. यावेळी एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात विनायक शिंपी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न देता किंवा पोलिसांना खबर न देता तिथून पळ काढला.
याप्रकरणी मयताचा मुलगा महेंद्र विनायक शिंपी (खैरणार) (वय ३८, रा. कुसुंबा) यांनी ९ जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी सपोनि गणेश वाघ तपास करीत आहे. पोलिस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार वाहन चालकाचा शोध घेत आहेत.









