आर्थिक कारणांनी आत्महत्या केल्याची नातेवाईकांची माहिती
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुसुंबा येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. ४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अंगणात खेळत असलेल्या ८ वर्षाच्या मुलाने घटना पाहिल्यानंतर त्यानं हंबरडा फोडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

समाधान भीमराव पाटील (वय ४२, रा. कुसुंबा ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह राहत होता. घराजवळ छोटीशी किराणा दुकान चालवून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता.(केसीएन)दरम्यान मंगळवारी दुपारी घरी समाधान हा त्याच्या मुलासह होता. मुलगा अंगणात दुकानाजवळ बसलेला होता. त्याच वेळेला घरात असलेल्या समाधानने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करून घेतली.
अंगणात बसलेला मुलगा घरात आला, तेव्हा त्याच्या पित्याने फाशी घेतलेले त्याला दिसले त्याने धावत जाऊन त्याच्या काकूला माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे त्याला उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळेला कुटुंबीयांनी एकच मन हेलावणारा आक्रोश केला.
या घटनेमुळे कुसुंबा गावावर शोककळा पसरली आहे.(केसीइन)दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान बँकेने पैशांसाठी समाधानच्या मागे तगादा लावल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.









