जळगाव शहरात कार्यालयामध्ये मातब्बर कार्यकर्त्यांसह नवोदित उमेदवारांची मोठी गर्दी
जळगाव ( प्रतिनिधी ) –शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता काहीच वेळामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील जी.एम. फाउंडेशन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. महानगरपालिकेत ५० टक्के महिलांची निवड होणार असल्यामुळे पुरुष उमेदवारांसह महिला उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आचारसंहितेनुसार या मुलाखती घेतल्या जात आहेत. एकूण ६०० उमेदवारांची गर्दी जीएम फाउंडेशन येथे झाली आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक १ आणि २ या मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रक्रिया पार पडल्या आहेत. मुलाखती घेण्यासाठी भाजपचे निवडणूक प्रभारी मंत्री संजय सावकारे, प्रमुख आ. राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचेसह पदाधिकारी उपस्थित आहेत.
प्रभागातील समस्या, भौगोलिक प्रश्न, नगरसेवक झाल्यावर काय करणार ?, सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी अशा विविध मुद्द्यांवर मुलाखतीमध्ये भर दिला जात असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान मातब्बर कार्यकर्त्यांसह नवोदित उमेदवार देखील मोठ्या आशेने मुलाखती प्रक्रियेला सामोरे जात असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले आहे. अनेक उमेदवारांनी त्यांचे कार्य अहवाल सोबत आणल्याचे दिसले तर काहींनी तोंडीच मुलाखती प्रक्रियेला सामोरे जाताना दिसत आहेत.









