पत्र्याच्या शेडमध्ये उतरलेल्या विजेच्या धक्क्याने ६ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत
जळगाव तालुक्यातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील सुजदे गावात काल मंगळवारी २ डिसेंबर सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना घडली. घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये खेळणाऱ्या अवघ्या सहा वर्षांच्या बालकाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.

विद्युत तारा तुटून पत्र्याच्या शेडमध्ये धोकादायकरित्या वीजप्रवाह उतरल्याने हा दुर्देवी अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, सोनवणे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
प्रेम नरेंद्र सोनवणे (वय ६) असे मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारी प्रेम घराबाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये खेळत होता. त्याचवेळी, शेडवरील मुख्य विद्युत तारांपैकी एक तार तुटून थेट पत्र्याच्या शेडवर पडली, ज्यामुळे संपूर्ण शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरला. प्रेम खेळता खेळता अचानक या पत्र्याच्या शेडच्या संपर्कात आला आणि त्याला जोरदार विजेचा धक्का बसला.
शेजाऱ्यांनी ही गंभीर बाब त्वरित लक्षात घेऊन तात्काळ धाव घेतली आणि सर्वप्रथम विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर प्रेमला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त
प्रेमचे वडील नरेंद्र सोनवणे हे शेतकरी असून, आई दीपाली सोनवणे गृहिणी आहेत. प्रेमला एक लहान भाऊ देखील आहे. आपल्या काळजाच्या तुकड्याच्या अशा अचानक जाण्याने प्रेमचे आई-वडील आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे.









