सुरत येथील कुडो स्पर्धेत पाचोराची किया पाटील चमकली; तीनही स्पर्धांत सुवर्ण त्रिकूट

सुरत – 2025–26 वर्षातील 17 वी अक्षय कुमार इंटरनॅशनल कुडो टूर्नामेंट, 16 वी कुडो नॅशनल टूर्नामेंट आणि 6 वा कुडो फेडरेशन कप या देशातील प्रतिष्ठित तीन स्पर्धा सुरत येथे उत्साहात पार पडल्या. देशभरातील तब्बल ४६२० स्पर्धकांच्या उपस्थितीत रंगलेल्या या स्पर्धांत पाचोरा येथील किया अतुल पाटील हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पुण्यात नोकरी निमित्त स्थायिक असलेल्या श्री अतुल पाटील यांची मुलगी आणि श्री बी. आर. पाटील यांची नात असलेल्या किया पाटीलने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात तीनही स्पर्धांत सुवर्ण पदक पटकावण्याचा पराक्रम केला. सलग सहा दिवस चाललेल्या मोठ्या स्पर्धेत तीन सुवर्णांची कमाई करत किया हिने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले.
या स्पर्धांना अभिनेते अक्षय कुमार, अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री डिंपल कपाडिया तसेच गायक अभिजीत सावंत यांनी भेट देत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
किया पाटीलच्या या यशामागे तिचे प्रशिक्षक श्री राकेश यादव सर तसेच पुणे जिल्हा कुडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री अरविंद मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या सुवर्ण यशाबद्दल पाचोरा परिसरातून तसेच महाराष्ट्र कुडो क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









